मोराणे धुळे - प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ व स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यशाळेमध्ये आयडीबीआय बँक पुणे येथील नवनियुक्त सुवर्णा पाटील यांनी वरील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तिने आयुष्याचा पूर्ण आलेख आजी विद्यार्थ्यांसमोर उलगडला ज्यामध्ये घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिने याच महाविद्यालयात एम एस डब्ल्यू यशस्वीपणे पूर्ण केले व सातत्यपूर्ण प्रयत्न यातूनच आयडीबीआय सारख्या चांगल्या बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून रुजू झाली असे भावनिक मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ सर यांनी सुवर्णा पाटील हिच्या यशस्वी वाटचालीबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आगामी काळामध्ये अशा आजी-माजी विद्यार्थ्यांचा मुक्त संवाद अधिक मोकळेपणाने झालाच पाहिजे अशा सूचना आयोजकांना केल्या. ज्यामुळे भविष्यात आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक वाढेल व अधिकाधिक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर पोहोचतील असा आशावाद व्यक्त केला. या प्रसंगी मधुकर पहाडे या माजी विद्यार्थ्यांनी समुपदेशन क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध संधी याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रश्नोत्तराचा तास ही यशस्वी झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांचे निरसन करून घेतले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. आहेर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी मानले.