त-हाडी (ता. शिरपूर) – देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन त-हाडी जिल्हा परिषद मराठी शाळेत देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. किरण अहिरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. आणि त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीताच्या गजराने परिसर दुमदुमला आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाची चमक झळकली.
या विशेष दिवशी गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी एकत्र येऊन घडवलेल्या आदर्श उपक्रमाचा गौरव करण्यात आला. गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, देशाचे वीर सैनिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थ यांनी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी जमा करून शाळेच्या विकासासाठी महत्त्वाची कामे हाती घेतली. या निधीतून शाळेच्या आजूबाजूचा परिसर उखरडे स्वच्छ करूणे, तारेच्या कंपाऊंडचे बांधकाम, शाळा परिसरात हिरवाईसाठी वृक्षलागवड, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कंपाऊंडचे आकर्षक पेंटिंग, तसेच विद्यार्थ्यांना वही–पेन वाटप अशी अनेक उपयुक्त कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
हा उपक्रम केवळ तहाडी गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शिरपूर तालुक्यात एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. “गाव एकत्र आल्यास शाळेचा विकास ही फक्त कल्पना न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरते” हा संदेश या कार्यातून स्पष्ट झाला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांचे मन जिंकले. गावातील मान्यवर, पालक, माजी विद्यार्थी अंगणवाडी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र पाटील व सुत्रसंचालन श्री.अशोक बडगुजर यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले, तसेच आभारप्रदर्शन सौ. शिवांगी देवरे मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमानंतर गावकऱ्यांनी व शिक्षकांनी या यशस्वी आयोजनाबद्दल एकमेकांचे अभिनंदन करत पुढील काळातही अशा विकासात्मक उपक्रमांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.