धुळे, मोराणे - प्रतिनिधी
धुळे :-मोराणे गावाचे सुपुत्र गणेश सुनिल उफाडे यांनी युजीसी मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासन प्राधिकृत, पुणे विद्यापीठ आयोजित व्याख्याता पदासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट ) समाजकार्य विषयात उत्तीर्ण झाले. सध्या ते समता शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे येथे ‘कार्यकम अधिकारी’ या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कामासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. गेल्या वर्षी त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' मिळाली होती, ज्यामुळे त्यांनी संस्थेचे संस्थापक प्रा. विलास वाघ यांच्या चरित्रावर लेखन करण्यास सुरुवात केली. आता सेट परीक्षेत मिळालेल्या यशामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या गणेश उफाडे यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना आता महाविद्यालयात सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठीची पात्रता मिळाली आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय गणेश उफाडे यांनी आपले मार्गदर्शक डॉ. जालिंदर अडसुळे यांना दिले आहे.
या यशाबद्दल बोलताना गणेश उफाडे यांनी सांगितले की, "डॉ. जालिंदर अडसुळे यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. त्यांच्या अभ्यास नियोजनामुळे आणि सोप्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे ही वाटचाल खूप सोपी झाली."
गणेश उफाडे यांच्या या यशाबद्दल समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रा. उषाताई वाघ, सचिव डॉ. जालिंदर अडसुळे व संस्थेचे कार्यकारी मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाचे समन्वयक प्रा. रचना अडसुळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिता पाटील आणि समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.