कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलनाचा सोहळा संपन्न झाला. डॉ. संजय ढोडरे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रा. डॉ. रवींद्र रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर सूत्रसंचालन श्रीमती उज्वला वाहने यांनी केले.
प्रेरणादायी सत्रे
पर्यटन आणि रोजगार या विषयावर प्रा. शिवाजी पाटील यांनी पर्यटन क्षेत्रातील रोजगारसंधींचे सविस्तर विवेचन केले. तांत्रिक प्रशिक्षण, मोबाईलचा सुयोग्य वापर आणि जागतिक बाजारपेठेत टिकण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर त्यांनी भर दिला.
संचार माध्यम आणि रोजगार या विषयावर प्रा. माधव कदम यांनी संवादकौशल्य, लेखन–वाचन व आधुनिक माध्यमांच्या प्रभावी वापरातून करिअरच्या नव्या दालने खुली होऊ शकतात, असे सांगितले. "कॉलेज हे भविष्य घडविण्याचे केंद्र आहे," हा त्यांचा संदेश उपस्थितांना प्रेरणादायी ठरला.
उद्योजकता विकास या विषयावर मीनाताई भोसले यांनी स्वत:च्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव कथन करत तरुणांना "नोकरी शोधणारा नव्हे, नोकरी देणारा व्हा" हा संदेश दिला. सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांना स्वावलंबी करण्याचा त्यांचा उपक्रम युवकांसाठी आदर्श ठरला.
समारोपात प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले यांनी तरुणांनी शिक्षणा बरोबरच कौशल्य, चिंतन आणि आत्मविश्वास विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. संजय ढोडरे यांनी मान्यवरांचे आभार मानले व सहभागींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.