जागतिक गर्भनिरोधक दिन


 जागतिक गर्भनिरोधक दिन

 मोराणे धुळे प्रतिनिधी - प्रकाश नाईक

 *मोराणे* :- दरवर्षी २६ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक गर्भनिरोधक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ कुटुंब नियोजनाची आठवण करून देणारा नसून, तो एक सामाजिक चळवळ, आरोग्याचा मार्गदर्शक आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे.

गर्भनिरोधकांविषयी बोलताना लोकांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काहींना वाटतं की ते फक्त महिलांसाठी आहेत, काहींना वाटतं की त्यांची गरज नाही, तर काहींना अजूनही त्याबद्दल बोलणं लाजिरवाणं वाटतं. पण खरं पाहता गर्भनिरोधक ही फक्त साधने नाहीत, ती समानतेची आणि स्वातंत्र्याची खूण आहेत.

आजच्या जगात प्रत्येकाला आपले आयुष्य नियोजनबद्ध जगायचे आहे. लग्न झाल्यावर लगेच पालक होणे ही जबाबदारी प्रत्येक जोडपे पेलू शकत नाही. करिअर घडवायचं, आर्थिक स्थैर्य मिळवायचं आणि नंतर मुलांना सर्व सुविधा द्यायच्या – हे ध्येय असताना गर्भनिरोधक साधने हेच त्यांचे खरे सहाय्यक ठरतात.

गर्भनिरोधकांचा वापर हा फक्त लोकसंख्या नियंत्रणासाठी नाही. तो महिलांच्या आरोग्याशी निगडित आहे. वारंवार होणारी गर्भधारणा ही स्त्रीच्या शरीरासाठी धोकादायक ठरते. अनेकदा अपूर्ण माहितीमुळे केलेले गर्भपात मातामृत्यूदर वाढवतात. हे टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षित साधनांचा वापर अत्यावश्यक आहे.

गर्भनिरोधक दिन आपल्याला शिकवतो की "मातृत्व ही सक्ती नसून, ती निवड आहे." प्रत्येक स्त्रीला कधी आणि कशी आई व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला पाठिंबा देणं म्हणजेच खरा प्रगत समाज घडवणं.

आज सोशल मीडियाच्या युगातही अजूनही गर्भनिरोधकाबद्दल चर्चा कमीच होते. पण या विषयावर बोलणं जितकं सोपं होईल, तितका समाज जागरूक होईल. शाळा, महाविद्यालये आणि तरुणांशी संवाद साधणं ही काळाची गरज आहे. कारण उद्याचं भविष्य हे आजच्या तरुणाईच्या हातात आहे.

नाव :- जयेश विश्वास गावित.

वर्ग :- FY.BSW

महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार