अंकलेश्वर–बु-हाणपूर या प्रस्तावित चौपदरी महामार्गाच्या कामाची चर्चा सध्या परिसरात सुरू असून या महामार्गाचा मार्ग शिरपूर तालुक्यातील तहाडी गावावरून जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर तहाडी गावातील ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून हा महामार्ग गावाच्या बाहेरून वळवण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अंकलेश्वर–बु-हाणपूर चौपदरीकरण हा मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून या महामार्गामुळे गुजरात आणि मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील अनेक भागांतील वाहतूक सुलभ होणार आहे. मात्र या प्रकल्पाचा मार्ग ज्या पद्धतीने आखण्यात आला आहे, त्यानुसार तो थेट तहाडी गावाच्या वरून जाणार असल्याची माहिती मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या मते, जर हा महामार्ग गावातूनच गेला तर गावातील दळणवळण व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. गावातील अनेक रस्ते बंद होण्याची शक्यता असून ग्रामस्थांना एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागेल. यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होणार आहेत.
तहाडी गावातील अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह हा लहान-मोठ्या व्यवसायांवर, दुकानदारांवर, शेतीपूरक उद्योगांवर तसेच रोजंदारीवर अवलंबून आहे. महामार्गाच्या कामामुळे अनेक घरे, दुकाने आणि व्यवसायिक ठिकाणे बाधित होण्याची शक्यता असल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय गावातील धार्मिक स्थळे, मंदिरे तसेच सार्वजनिक ठिकाणांवरही या प्रकल्पाचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः गावातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनू शकतो. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
तहाडी ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक नियुक्त असल्यामुळे या विषयाबाबत ग्रामस्थांना अधिकृतपणे कोणतीही सविस्तर माहिती मिळालेली नाही. ग्रामस्थांना पूर्वसूचना न देता किंवा त्यांच्या भावना विचारात न घेता असा मोठा प्रकल्प गावातून नेण्यात येत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर तहाडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन लवकरच प्रशासनाकडे अर्ज स्वरूपात निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनाद्वारे तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गावाची परिस्थिती समजावून सांगितली जाणार आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, विकासाच्या कामांना विरोध नसून गावाचे नुकसान टाळण्यासाठी महामार्गाचा मार्ग गावाच्या बाहेरील बाजूने वळवण्यात यावा.
तहाडी गावाच्या विकासाला आणि प्रगतीला ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. मात्र गावातील लोकांचे जीवनमान, व्यवसाय आणि धार्मिक ठिकाणे सुरक्षित राहावीत, हीच ग्रामस्थांची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही तहाडी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

