महाराष्ट्र दिनानिमित्त “आनंदाची तऱ्हाडी” स्मरणिका प्रकाशन व इयत्ता पहिली प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण सोहळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तऱ्हाडी त. बो. येथे देशभक्ती, शिक्षण आणि नव्या शैक्षणिक वाटचालीचा सुंदर संगम

 तऱ्हाडी:- १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तऱ्हाडी त. बो., ता. शहादा येथे भारतीय तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण, “आनंदाची तऱ्हाडी” या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसर देशभक्ती, आनंद आणि शैक्षणिक उत्साहाने भारावून गेला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब धनराज पाटील यांच्या शुभहस्ते भारतीय तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांद्वारे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान उपसरपंच धनराज आप्पा पाटील, सरपंच धनराज भाऊ ठाकरे, परिवार्धा केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक देवरे, पोलीस पाटील दिनेश प्रल्हाद ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते  साहेबरावदादा ईशी, गुलाबरावदादा ईशी, दिलिप ईशी, ग्रामविकास अधिकारी शैलेन्द्र मिलखे आप्पा, तलाठी कल्पना बोरसे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम भाऊ ठाकरे, मुख्याध्यापक शांतिलाल अहिरे, सुरेश भाऊ ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षकवृंद व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

        महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहन कार्यक्रमानंतर शाळेची “आनंदाची तऱ्हाडी”ह्या नावाने वार्षिक स्मरणिका उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आली. श्री. धनराज आप्पा पाटील यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या स्मरणिकेमध्ये शाळेच्या वर्षभरातील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. 

 विद्यार्थ्यांची मनोगते, शिक्षकांचे विचार, विविध उपक्रमांचे वृत्तांत, कलाकृती व छायाचित्रे यामुळे स्मरणिका अधिक समृद्ध व आकर्षक बनली आहे.

स्मरणिका हातात घेताच उपस्थित पालक, ग्रामस्थ व मान्यवरांनी तिचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना इतक्या सुंदर स्वरूपात जतन करण्याचा प्रयत्न हा स्तुत्य असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. अनेक ग्रामस्थ स्मरणिकेतील विद्यार्थ्यांचे फोटो, कलाकृती व उपक्रम उत्सुकतेने पाहत होते. विद्यार्थ्यांमध्येही आपल्या शाळेची स्मरणिका पाहण्याबाबत विशेष आनंद व कुतूहल दिसून येत होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अशोक देवरे साहेब उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की,“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरतात." ‘आनंदाची तऱ्हाडी’ही स्मरणिका केवळ उपक्रमांची नोंद नसून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा, शिक्षकांच्या मेहनतीचा आणि पालकांच्या विश्वासाचा जिवंत दस्तऐवज आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे उत्कृष्ट कार्य या शाळेमार्फत होत आहे.”

तसेच इयत्ता पहिलीच्या प्रवेशोत्सवाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “लहान मुलांना आनंदी वातावरणात शाळेशी जोडणे त्यांची शाळेविषयी भीती दूर करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कृतीआधारित व खेळातून शिकविण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते.”

यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा विशेष शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टाळ्यांचा गजर आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच आनंददायी व भीतीमुक्त शिक्षण मिळावे शाळेविषयी गोडी आकर्षण निर्माण व्हावे या उद्देशाने शाळेत विविध शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले होते.

या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास, मानसिक विकास , शारीरिक विकास , भाषा विकास, गणन कौशल्य विकसन तसेच निरीक्षण क्षमतेचा आढावा घेणारे विविध उपक्रम ठेवण्यात आले होते. चित्र ओळखा, रंग जुळवा, अक्षर ओळख, संख्या खेळ, हालचाल आधारित कृती, गोष्टी व भाषा खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना व पालकांना आनंदी वातावरणात मार्गदर्शन करण्यात आले.

लहान मुले मोठ्या कुतूहलाने प्रत्येक उपक्रम अनुभवत होती. खेळता-खेळता शिकण्याच्या या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता. पालकांनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “आमच्या मुलांना आनंदी वातावरणात शिक्षणाची सुरुवात होत आहे,” अशा भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा मांडला. गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, क्रीडा सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे, शिक्षक लक्ष्मीपुत्र उप्पीन, नीलिमा वसावे, ज्योती पाडवी, ज्योती पाटील तसेच स्वयंसेवीनेहमी मदत करणारे विनोद वळवी सर, स्वयंपाकी कर्मचारी खंडुगीर गोसावी, रंजना सोनवणे व अंगणवाडी सेविका रेखा निकुंभे, शारदा ठाकरे, वैशाली मॅडम व मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी बयराम पवार, दिपक कापडी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे महाराष्ट्र दिन, वार्षिक स्मरणिका प्रकाशन आणि इयत्ता पहिली प्रवेशोत्सव या तिन्ही उपक्रमांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक लक्ष्मीपुत्र उपीन सर यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार