जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशनने केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व KCIIL–KIEDC सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी

 

 जळगाव प्रतिनिधी दि. २३ जून २०२६ : जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन, अक्कलकुवा यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव, तसेच केबीसीएनएमयू सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (KCIIL) यांच्या KBCNMU इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट सेल (KIEDC) उपक्रमांतर्गत त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) यशस्वीरित्या संपन्न केला.

हा सामंजस्य करार केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित KIEDC ओरिएंटेशन कार्यक्रमात विद्यापीठाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कराराचा उद्देश उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवोपक्रम (Innovation), उद्योजकता (Entrepreneurship), इन्क्युबेशन, कौशल्य विकास आणि उद्योग–शैक्षणिक सहकार्य यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

या कार्यक्रमात जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन, अक्कलकुवा यांच्या वतीने प्राचार्य डॉ. अमजद कमाल तसेच KIEDC समन्वयक डॉ. आशिष जी. वसावे यांनी सहभाग नोंदवून महाविद्यालयाच्या वतीने त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी डॉ. अमजद कमाल यांनी सांगितले की, या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी नवोपक्रम, उद्योजकता विकास, संशोधन, कौशल्यविकास आणि शैक्षणिक सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच डॉ. आशिष जी. वसावे यांनी महाविद्यालयात स्थापन होणाऱ्या KIEDC च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशील विचार, उद्योजकीय कौशल्ये, नेतृत्वगुण आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

हा त्रिपक्षीय सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) मधील नवोपक्रम, अनुभवाधारित शिक्षण, उद्योजकता आणि संस्थात्मक सहकार्य या उद्दिष्टांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. या माध्यमातून जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन, अक्कलकुवा हे भविष्यातील शिक्षकांमध्ये संशोधन, सर्जनशीलता, नवोपक्रम आणि उद्योजकतेची संस्कृती विकसित करण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार