काठी :- अक्कलकुवा तालुक्यातील काठी चिपटन संस्थानिकांच्या राजवीर परिवार व पारंपरिक पुजारी परिवाराची संयुक्त नियोजन बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी संपन्न झाली. आगामी दसरा सण व उत्सव आदिवासी संस्कृती, परंपरा, रूढी व प्रथेनुसार पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दसरा पूजाविधीसाठी आवश्यक पारंपरिक साहित्य, विविध धार्मिक विधी, त्यासाठी लागणारा अंदाजे खर्च तसेच उत्सवाच्या आयोजनातील विविध जबाबदाऱ्यांबाबत उपस्थितांमध्ये सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीस काठी चिपटन संस्थानचे प्रमुख पृथ्वीसिंग पाडवी, महेंद्रसिंग पाडवी, रणजितसिंग पाडवीराजेंद्रसिंग पाडवी, शेरसिंग पाडवी, बहादुरसिंग पाडवी, गणपतसिंग पाडवी व हिरेसिंग पाडवी तसेच पारंपरिक पुजारी परिवारातील रायसिंग हांद्या वसावे, गोबर्या टेबर्या वसावे रेहंज्या वसावे आणि इतर ज्येष्ठ व प्रमुख सदस्य उपस्थित होते.
काठी गावातील दसरा उत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असल्याने, उत्सवाच्या पुढील नियोजनासाठी परिसरातील पोलीस पाटील, नागरिक, घोडेस्वार, घोडे मालक तसेच संबंधित प्रशासनाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत पुन्हा संयुक्त बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
उत्सवाच्या काळात परंपरा आणि सांस्कृतिक विधींचे जतन, नागरिकांचा सहभाग, घोड्यांची व्यवस्था, सुरक्षितता आणि प्रशासनाशी समन्वय याबाबत पुढील बैठकीत सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे.
पूर्वजांनी जपलेली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, हा या नियोजन प्रक्रियेचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

